गया – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांच्या गया जिल्ह्यातील बोधी बिगहा गावात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बोधी बिगहा मधील सार्वजनिक सभागृहाची इमारत डायनामाईटचा स्फोट करुन उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली आहे. बिहारमधील गया या जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या प्रभाव आहे.

गया जिल्ह्यातील डुमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोधी बिगहा गावातील सार्वजनिक सभागृह नक्षलवाद्यांनी डायनामाईटचा स्फोट करुन उडवून दिले. या सभागृहाचे उद्गाटन जीतनराम मांझी यांनी मागील महिन्यात केले होते. स्फोटात उडवून दिलेल्या सभागृहात पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार होते. नक्षलवाद्यांनी या घटनेनंतर गोळीबार करत गावातून निघून गेल्याची माहिती आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. डुमरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी विमल कुमार यांनी या घटनेला पुष्ठी दिली आहे. नक्षलवाद्यांनी घटनास्थळावर पत्रक देखील टाकले होते. यामध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारत धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पोलिसांकडील सूत्रांनुसार, नक्षलवादी हल्ला झालेल्या ठिकाणी डुमरिया पोलीस ठाण्याचे कार्यालय सुरु करण्यात येणार होते. जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं घटनास्थळी जाऊन या घटनेची माहिती घेतली आहे. पोलिसांनी यानंतर ठिकठिकाणी छापेमारी करत नक्षलवाद्यांचा शोध सुरु केला आहे.
गया जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांनी यापूर्वी हल्ले केले आहेत.
दरम्यान, बिहारमध्ये आज जेडीयू आणि भाजपप्रणीत एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नितीशकुमार हे सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जेडीयू आणि भाजपचे प्रत्येकी 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यासोबत हम आणि विकासशील इन्सान पार्टीचा 1 आमदार मंत्रिपदाची शपथ घेईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.







