सभा संपल्यावर महिलांची ५ किलोमीटर पायपीट
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात आज रविवारी दि. २५ रोजी मोठ्या थाटात लखपती दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही अनेक मंत्री व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी धरणगाव, एरंडोल, अमळनेर येथून आलेल्या सुमारे १५० ते २०० बसेस मात्र थोडा उशीर झाल्याने व पंतप्रधान यांचे भाषण सुरु झाल्याने अजिंठा चौकातच थांबविण्यात आल्या. यामुळे सुमारे २ तास महिला बसमध्येच ताटकळलेल्या दिसून आल्या.
रविवारच्या लखपती दीदी मेळाव्यात हजारो महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. तर मेळाव्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मेळाव्यासाठी हजारो बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. धरणगाव, एरंडोल,चोपडा,पारोळा,अमळनेरसह धुळे जिल्ह्यातील येथून सुमारे १५० ते २०० बसेस या जळगावात आल्या. मात्र तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु झाल्यामुळे त्या अजिंठा चौकापासून ते रेमण्ड चौफुली दरम्यान सुमारे २ तास ताटकळत राहिल्या. यावेळी बऱ्याच महिलांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागताना दिसून आले.
तर दुसरीकडे लखपती दीदी मेळावा संपल्यावर महिलांना जाण्यासाठी वाहने उपलब्ध न झाल्याने त्यांना मेळाव्याच्या स्थळापासून ते अजिंठा चौकापर्यंत सुमारे ५ किलोमीटर पायपीट करत जावे लागल्याचे विदारक चित्र दिसून आले. यावेळी पायपीट होत असल्याने महिलांचा संतापही व्यक्त होत असलेला दिसून येत होता. रस्त्यात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक महिला तहानलेल्या दिसून आल्या.