यावल शहरातील तरुणावर गुन्हा दाखल
यावल प्रतिनिधी :- यावल शहरातील एका भागातील तरुणाने १९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करीत वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे अपहरण करून तिच्याशी मालेगाव येथे लग्न लावत अत्याचार केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील एका भागातील तरुणाने यावल शहरातील एका भागातील १९ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. नंतर तिला वाढदिवस साजरा करायचा असल्याचे सांगून बोलावले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचाराचा त्याने व्हिडिओ तयार केला तसेच या तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली व पिस्टल दाखवून तिला तिच्या आई-वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी दिली. नंतर या तरुणाने तरुणीचे एका वाहनातून अपहरण करीत तिला मालेगाव शहरात नेत लग्न केले आणि नंतर तिला आपल्या घरात डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे.









