जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – एका वयोवृद्ध महिलेचा विदगाव ते कानळदा रस्त्यावर गुरुवारी सकाळी १० वाजेनंतर अपघातात मृत्यू झालेला आहे. या महिलेने एखाद्या दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितले असेल आणि दुचाकीच्या चाकात साडीचा पदर अडकून ती खाली पडून मयत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रभावती निंबा धनगर (वय ७३, रा. शिरसाड ता. यावल) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या शिरसाड येथे पती, मुलगा, सून, मुलगी यांच्यासह राहतात. गुरुवारी सकाळी १० वाजेनंतर त्या जळगावच्या दिशेने निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर लिफ्ट दिली. सदर महिला दुचाकीवर जात असताना कानळदा रस्त्यावर महिलेच्या साडीचा पदर चाकात अडकून अचानक अपघात होऊन महिला खाली पडली. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार हा दुचाकी घेऊन पसार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मयत महिलेच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी आक्रोश केला. दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.