जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाचे, देखभाल व दुरुस्ती निधीचे आणि पंचायत समितीचे सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषद ठराव समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सन २०२४-२५ या वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करताना, चालू आर्थिक वर्षातील अपेक्षित जमा आणि खर्चाचा अंदाज विचारात घेण्यात आला आहे. सर्व खातेप्रमुखांनी त्यांच्या मागण्या ठराव समितीकडे सादर केल्या होत्या. या मागण्यांवर सखोल चर्चा आणि आढावा बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर लेखाशीर्षनिहाय खर्चासाठी ४०.८६ कोटी रुपयांची सुधारित तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुधारित तरतूद मंजूर करताना समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण या विभागांतील मागील आर्थिक वर्षाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप लक्षात घेऊन महसुली जमा २५.५० कोटी रुपये राहील, असा अंदाज आहे. एकूण जमा रकमेतून ४६.६१ कोटी रुपये खर्चाचा अंदाज वजा जाता ५.९३ लाख रुपये महसुली शिल्लक राहतील. अनुदानाचे वितरण शासनावर अवलंबून असल्याने जमा रकमेत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात मागील अनुशेषासह विविध विभागांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ३.३८ कोटी लाख रुपये, दिव्यांग कल्याणासाठी २.३३ कोटी लाख रुपये, महिला व बाल कल्याणासाठी २.२४ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभाग दुरुस्ती निधीसाठी ४ कोटी लाख रुपये, तसेच इतर विभागांसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती निधी तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे मूळ अंदाजपत्रक जसेच्या तसे ठराव समितीच्या मान्यतेने मंजूर करण्यात आले. या अर्थसंकल्पात विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे.