बांभोरी परिसरात ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
धरणगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखा व पाळधी पोलीस यांनी अवैध गॅस विरोधात संयुक्त कारवाई करुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही छाप्यात एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच पाळधी पोलिसांचे पथक यांनी अवैध गॅस भरणाऱ्याविरोधात मोहीम आखली आहे. यात सर्व प्रथम बांभोरी येथे एसएसबीटी कॉलेजच्या मागे टाकलेल्या छाप्यात अनिल शंकर सोनवणे (रा. बांभोरी) हा अवैध गॅस भरताना आढळून आला. त्याचे कडून ५० एचपी कंपनीचे रिकामे सिलेंडर, त्याच कंपनीचे दोन भरलेले सिलेंडर, ८ भारत गॅस कंपनीचे सिलेंडर, वजन काटा, गॅस भरण्याचे मशिन, १ मारुती सुझुकी कंपनीचे वाहन क्र. एम एच १९ सी एक्स १०७५ असा सामान मिळून आला. तर दुसऱ्या कारवाईत महामार्गावर असलेल्या हॉटेल सूर्याच्या बाजूला मोईन शेख युसुफ शेख (रा. तांबापुरा, जळगांव) याचे कडे भारत गॅस कंपनीचे २ भरलेले सिलेंडर, त्याच कंपनीचे ६ रिकामे सिलेंडर, वजन काटा, गॅस भरण्याचे मशिन असा माल मिळून आला.
या दोन्ही छाप्यात एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला असून या दोघांवर पाळधी पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पी. एस. आय. सोपान गोरे, सलीम तडवी, छगन तायडे, मयूर निकम, पाळधीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे, ए. एस. आय. सुनिल लोहार, रमेश सुर्यवंशी, अमोल धोबी यांचा पथकाने केली आहे.