बीआरएस पक्षाला पडणार खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षांतर
जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार या मोठ्या नेत्यांना गळाला लावल्यावर आता भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा हे शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेणार आहे. यामुळे बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
ठाकरे गटात इनकमिंग सुरूच आहे. गेले २ वर्षांपासून बीआरएस पक्षाचे लक्ष्मण पाटील हे काम करीत आहे. शेतकरी, मजूर यांच्यासाठी लक्ष्मण पाटील यांचे जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठे काम आहे. बीआरएस पक्षाच्या माध्यमातून लक्ष्मण पाटील यांनी पक्षसंघटनासह अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण पाटील हे पक्षांतर करीत आहे.
गेले अनेक दिवस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार आणि माजी खा. उन्मेष पाटील हे लक्ष्मण पाटील यांच्या संपर्कात होते. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आता मुंबईत मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत आदींच्या उपस्थितीत लक्ष्मण पाटील हे पक्षप्रवेश करीत आहे. यामुळे ठाकरे गटाला अधिक बळ मिळणार असून आता लोकसभेसह विधानसभावर देखील ठाकरे गट भगवा फडकवणार याबाबत कयास लावला जात आहे.