पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाली पूजा
(शशांक मराठे)
पारोळा (प्रतिनिधी) : नवरात्रीच्या सुरुवातीपासून गेले १४ दिवस बालाजी भक्त ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण १ वाजून ४० मिनिटांनी बालाजी भक्तांना पहावयास मिळाला. श्री बालाजी महाराज रथावर विराजमान होऊन, जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मार्गस्थ झाले.
सकाळी १२ वाजून २० मिनिटांनी रथाची विधिवत पूजा सुरू झाली. या पूजेत मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी व त्यांच्या पत्नी सारिका शिंपी, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. १ वाजून ४० मिनिटांनी श्री बालाजीचा रथ मार्गस्थ झाला. रथाची मुख्य पूजा मुख्य पुरोहित हरीश पाठक यांच्या उपस्थितीत प्रमुख अतिथी यांनी केली.
श्री बालाजी महाराजांच्या या रथोत्सवा निमित्त, जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप उपस्थित होते. या मान्यवरांचा श्री बालाजी संस्थान व अन्नछत्र मंडळातर्फे विश्वस्त व माजी खासदार ए. टी. पाटील यांनी श्रींची प्रतिमा देऊन सत्कार केला. यात्रेत नऊ लेझीम मंडळांनी सहभाग नोंदवीला. त्यात जय जिजाऊ महिला लेझीम मंडळ हे यात्रेकरूंचे आकर्षण ठरले. भाविकांसाठी रथ मार्गावर सामाजिक संस्थांनी पिण्याचे पाणी तसेच काही ठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.