रावेर वनविभागाची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : वनविभागाच्या गस्ती पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईत लाकडाची अवैध वाहतूक करणारी बोलेरो पिकअप आणि टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला. या कारवाईत बोलेरो पिकअप आणि टाटा कंपनीच्या ट्रकसह ८ लाख १० हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे व सहकारी सावदा-तांदळवाडी रस्त्याने मंगळवारी रात्री गस्त करीत असताना तांदळवाडी गावाजवळ महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप संशयास्पद आढळली. वाहनाचा पाठलाग गस्ती पथकाने केल्यानंतर वाहन (क्रमांक एम.एच.०४ जी.एफ. ७२६३) मधून २५ साग इमारती नगांचा माल जप्त करण्यात आला. वाहन चालक युवराज सीताराम तायडे (रा.मांगलवाडी) यांच्याकडे परवाना नसल्याने वाहनासह लाकूड जप्त करण्यात आले. ४३ हजार ११६ रुपये किंमतीचे सागवानी लाकूड व ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीच्या पिकअप मिळून ३ लाख ८८ हजार ११६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे हे पाडळे खुर्द भागात गस्त घालत असताना मौजे पाडळे खुर्द गावाजवळ टाटा कंपनीची ट्रक (एम.पी.४५ एच.३४२) जप्त करण्यात आली. या वाहनात पंचरास जळावू तसेच निम इमारती लाकूड आढळले तर वाहन चालक नामे शेख कलीम शेख इलियास (रा. रावेर) याच्याकडे लाकूड वाहतुकीचा पास नसल्याने ३८ हजार ११५ रुपये किंमतीचे पंचरास जळावू लाकूड व ३ लाख ८१ हजारांचा ट्रक मिळून एकूण ४ लाख २२ हजार ७६२ रुपयांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला.
ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर वनक्षेत्रपाल अजय बावणे, आगार रक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक जगदीश जगदाळे, वाहन चालक विनोद पाटील, रावेर रेंज वनरक्षक थवर्या बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला, निलेश बारेला, वनपाल राजेंद्र सरदार, वनरक्षक सविता वाघ, जगदीश जगदाळे, सुभाष माळी, इनुस तडवी आदींच्या पथकाने केली.