मान्यवरांच्या हस्ते उद्या वितरण
जळगाव (प्रतिनिधी) : ‘मल्हार’च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशनद्वारे हेल्प फेअर अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या आरोग्यदूत पुरस्कारांची नावे नुकतीच जाहीर झाली आहे. या वर्षी या पुरस्काराचे मानकरी उमेश बेंडवाल, गौतम सोये, सोनू चिरवडे, सुंदराबाई आहिरे, दीपाली भालेराव, बबलू गायकवाड ठरले आहेत.
या पुरस्कारांतर्गत एक स्मृतिचिन्ह व रु. ५००० चे रोख पारितोषिक दिले जाते. सोबतच प्रत्येक पुरस्कारार्थीची चित्रफीत बनवून ती कार्यक्रमात दाखविली जाते. या वर्षीचा आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. ४ एप्रिल २०२५ रोजी, सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे स. १० ते दु १ या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका आणि ऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट घेत असलेल्या कार्यक्रमात होणार आहे. या पुरस्कारासाठी महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांच्या कार्याचे वर्षभर अवलोकन करून त्यातून पुरस्कारार्थी ठरवले जातात.
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने ही निवड केली जाते. दरवर्षी या पुरस्कारासाठी कार्यक्रमाचे नियोजन मल्हार कम्युनिकेशन्स, जळगांव करीत असते. आरोग्यदूत पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना यांचे मार्गदर्शन लाभते. यावर्षी पुरस्कारासोबतच सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्नेहभोजनही देण्यात येणार असून महानगरपालिकेच्या प्रत्येक कायम स्वच्छता कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एक सन्मानपत्र वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मल्हार कम्युनिकेशन्सचे शाम पवार, कृष्णा भोई, साजिद खान, चारुदत्त मल्हारा, निखिल शिंदे आदींनी परिश्रम घेतल्याचे हेल्प फेअर टीमचे सदस्य भरत अमळकर, प्रकाश चौबे, गनी मेमन, नंदू अडवाणी, अमर कुकरेजा, चंद्रशेखर नेवे, प्रशांत मल्हारा व आनंद मल्हारा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.