जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी):- पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसऱ्यांदा विवाह करणे आणि वडिलांच्या आजारपणाचे खोटे कारण सांगून दागिने व रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात पत्नीसह तिच्या कुटुंबातील ६ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी सुनील रामलाल नाईक (वय ३०, रा. मालखेडा, ता. जामनेर) यांचा विवाह आरोपी मीनाक्षी अजमल जाधव हिच्याशी झाला होता. लग्नापूर्वी मीनाक्षीने आपले पहिले लग्न झाले असल्याची माहिती सुनील आणि त्यांच्या परिवारापासून लपवून ठेवली. विश्वास संपादन करून तिने सुनील यांच्याशी दुसरे लग्न केले आणि त्यांचा विश्वासघात केला.
२५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास, मीनाक्षीने तिचे वडील आजारी असल्याचे खोटे कारण सांगितले. घरच्यांचा विश्वास संपादन करून तिने घरातील ४ तोळे सोन्याचे दागिने आणि लग्नात अहेर म्हणून मिळालेली ३ लाख रुपयांची रोकड, असा एकूण मोठा ऐवज घेऊन ती निघून गेली. आपली आर्थिक आणि मानसिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुनील नाईक यांनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी मीनाक्षी अजमल जाधव, अजमल जोहरसिंग जाधव, अरुणा अजमल जाधव, रणजित अजमल जाधव, महेश अजमल जाधव आणि गजानन जोहरसिंग जाधव (सर्व रा. वडगाव नालबंदी, ता. भडगाव, ह.मु. टिटवाळा, जि. ठाणे) यांच्याविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिब्रे करत आहेत. सध्या कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.









