चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील डांंमरून येथील घनश्याम मुरलीधर पाटील यांना लग्नाच्या भूलथापा देत 2 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घालणारी तोतया नवरी आणि तिचा साथीदार एजंट फरार झाले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तोतया नवरी व एजंटला अटक केलीय आहे
या आरोपींनी डांमरूण येथील घनश्याम पाटील यांना लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला . लग्नासाठी नवरी बनलेली आशा संतोष शिंदे (३१ , रा. सुंदरवाडी, चिकलठाणा, जि – औरंगाबाद ) व एजंट किरण भास्कर पाटील (४५ , रा – आमडदे ता – भडगाव) यांनी घनश्याम पाटील यांच्याकडून २ लाख रुपये व ४० हजारांचे दागिने घेतले होते, मात्र लग्न लावण्यापूर्वी या दोघांनी 2 लाख 40 हजारांचा ऐवज घेवुन पोबारा केला होता.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला घनश्याम पाटील यांनी गुन्हा दाखल केला होता. तपासी अंमलदार पोहेका विजय शिंदे यांनी तपास करत महिनाभरानंतर तोतया नवरी व तिच्या साथीदारालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांनी अजून किती जणांना जाळ्यात ओढले आहे, याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. अशा टोळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे .