जळगाव “जीएमसी”मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव (प्रतिनिधी) :- लघवीच्या पिशवीत मुतखडा अडकून पडल्याने जीवघेण्या वेदनांपासून ११ वर्षीय मुलाला मुक्त करण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले.
शंकर बापू भिल (वय ११, अडावद ता. चोपडा) या मुलाला लघवीच्या पिशवीत मुतखडा होता. त्याच्यामुळे त्याची लघवी बंद झाली होती. त्यामुळे त्याला जीवघेणा त्रास सुरु झाला. त्याला खाजगी दवाखान्यात नेले होते. मात्र पैसे नसल्यामुळे शंकरच्या पालकांनी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी शल्यचिकित्सा विभागातील युनिट प्रमुख डॉ. संगीता गावित यांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या.
तेव्हा लघवीच्या पिशवीत ४ सेंटीमीटरचा मुतखडा आढळून आला. शंकरवर वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून तो खडा काढीत जीवघेण्या त्रासातून मुक्ती दिली.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत हि शस्त्रक्रिया करण्यात आली. शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, सहायक प्रा. डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. महेंद्र मल, डॉ. सुनील गुट्टे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना बधिरीकरण शास्त्र विभागातील प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. अंजू पॉल, डॉ. क्षितिजा तोणपी यांच्यासह शस्त्रक्रियागृह इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतूक केले.