चाळीसगाव तालुक्यातील नांदगाव रस्त्यावरील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पुणे येथे कंपनीत असलेल्या रोकडे तांडा ता. चाळीसगाव येथील सॉफ्टवेअर तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर नस्तनपूर पिंपरखेड रेल्वे गेटजवळ शुक्रवारी रात्री घडली. आठवडाभरापूर्वीच या तरुणाचा साखरपुडा झाला होता.
चाळीसगाव तालुक्यातील रोकडे तांडा येथील सुभाष सरिचंद राठोड (वय ३०) हा तरूण अपघातात ठार झाला आहे. पुणे येथे एक नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. मयत सुभाष राठोड याच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. शनिवार-रविवार सुट्टी असल्याने तो दुचाकीने रोकडे तांडा येथे घरी येत असताना शुक्रवार रात्री सात वाजेच्या सुमारास नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर नस्तनपुर – पिंपरखेड रेल्वे गेट बंद असल्याने तो उभा होता.
यावेळी अंधार असल्यामुळे अंदाज न आल्याने भरधाव पिकअप वाहनाने त्याला धडक दिली. त्यात सुभाष राठोड याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रोकडे तांडा येथे कळताच गावकऱ्यांनी पिंपरखेड रेल्वे गेटकडे धाव घेतली. परंतु सुभाषचा मृत्यू झाल्याचे कळल्याने गावावर शोककळा पसरली होती. सुभाष याचा गेल्या आठवड्यातच मोठ्या उत्साहात साखरपुडा झाला होता. त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण होते. मात्र नस्तनपूर जवळ झालेल्या दुर्दैवी अपघाताने एका क्षणात कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला. या घटनेने रोकडे तांडावासियांचे मन सुन्न झाले आहे.