वाचा, कुठे घडली घटना..!
नाशिक (वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या “लाडकी बहीण योजने”चा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची लगबग सुरु झाली आहे. कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी महिला धावपळ करत आहे. नाशिक तालुक्यातही “लाडकी बहीण योजने”चे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात निघालेल्या महिलेचा वाटेतच अवजड वाहनाच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या येवल्यात ही घटना घडली आहे.
उज्वला चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. उज्वला या येवला रेल्वे स्टेशन परिसरात राहत होत्या. उज्वला चौधरी या लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी निघाल्या होत्या. मात्र वाटेतच त्यांना नगर -मनमाड महामार्गावर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अज्ञात वाहनाने धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा जागीच मृत्य झाला. “लाडकी बहीण योजने”चा लाभ घेण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहे.