पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगावात माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून पात्र बहिणींना १७ ऑगस्टला त्यांच्या खात्यात आमच्या शासनाकडून २ हप्ते दिले जाणार आहेत. ती राखी पौर्णिमेची बहिणींना आम्ही दिलेली ओवाळणी असेल अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी जळगावात दिली.
जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद गुरुवारी दिनांक १ ऑगस्ट रोजी जळगावला पार पडली. त्यावेळेला ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावांनाही सोडले नसून त्यांच्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ सुरु केली आहे. त्यात १२ वी पास झालेल्यांना ६ हजार, आय. टी. आय, पदविका असणाऱ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर असणाऱ्या युवकांना १० हजार रुपये दिले जाणार आहे. या युवकांना विविध आस्थापनेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. आपण त्यांना कामासाठी, कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.