यावल तालुक्यातील चुंचाळे येथे ऑपरेटरला अटक
यावल (प्रतिनिधी) :- स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबन्धक विभागाने शनिवारी दि. १७ रोजी दुपारी अटक केली. तर चुंचाळे ग्रामसेवक हा पसार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर धुडकू कोळी (३५, रा. चुंचाळे ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. तर फरार झालेल्या हेमंत कमलाकर जोशी याचा शोध सुरु आहे. चुंचाळे येथील ४६ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल ५० टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, १६ रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगावी तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.
शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर ग्रामसेवक हेमंत जोशी हे पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.हा सापळा जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.