रावेर येथे एसीबीची कारवाई
रावेर ( प्रतिनिधी ) – कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरिक्षकाला खासगी पंटरसह लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्यावर रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील खानापूर परिसरात अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने धडक कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी खात्याचे दुय्यम निरिक्षक विजय पाटील आणि त्यांच्या खासगी पंटर भास्कर चंदनकर यांना अटक केली आहे.यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या विरूध्द आधीच राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने कार्यवाही केली होती. या प्रकरणात पुढील कारवाई न करण्यासाठी विजय पाटील यांनी दहा हजार रूपयांची लाच मागितली होती. या अनुषंगाने संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार एसीबीचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी एक पथक तयार केले.
या पथकाने सापळा रचला. यानुसार, रावेर तालुक्यातील खानापूर येथे लाचेचे १० हजार रूपये विजय पाटील यांनी भास्कर चंदनकर याच्याकडे देण्याचे तक्रारदाराला सांगितले. यानुसार चंदनकरने दहा हजार रूपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. यानंतर विजय पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने केली. विजय पाटील हे राज्य उत्पादन शुल्कच्या रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते.









