जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबा येथे विहिरीत पडून तरूण ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. ग्रामस्थांनी प्रयत्न केल्यानंतर विहिरीत शोधकार्य करून त्याचा मृतदेह शोधला. मंगळवारी 13 रोजी त्याचा मृतदेह दुपारी बारा वाजेच्या सुमारास आढळून आला. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
तालुक्यातील कुसुंबा येथे अवधूत गंभीर पाटील वय 32 हे त्यांच्या आई – वडिलांसह राहतात. ते जळगाव टोलनाक्याजवळ असलेल्या किरण मशीन टूल्स येथे लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी घरून जेवण केल्यानंतर ते बाहेर पडले होते.
त्यांनी त्यांच्या मित्रांना फोन करून सुमारे तीन वाजता नारखेडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीजवळ बोलावून घेतले होते. मित्र त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अवधूत पाटील हा विहिरीत पडला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह दिसून येत नव्हता. दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्याच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू होती. अखेर मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मात्र तो विहीरीवर बसला होता आणि विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास त्याच्या मित्रांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुपारी नेण्यात आला होता. त्याच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो मंगळवारी नवीन दुचाकी घेण्यासाठी दुचाकी शोरूमला जाणार होता मात्र त्यापूर्वीच ही घटना घडली. अवधूत पाटील यांच्या पश्चात आई-वडील आणि विवाहित बहीण आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत