देवदूत बनला रेल्वे कर्मचारी !
मुंबई (वृत्तसेवा) :- मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकलमध्ये घाई करणे किती जीवावर बेतू शकते, याचा प्रत्यय नुकताच कुर्ला स्थानकावर आला. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील जॉन पॉल या तिकीट तपासणीस कर्मचाऱ्याने आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास कुर्ला स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सीएसएमटीकडे जाणारी लोकल आली होती. गाडी सुरू झाल्यानंतर वेग पकडत असतानाच, बेबी भास्कर गायकर या वृद्ध महिलेने धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने त्या घसरून प्लॅटफॉर्मवर पडल्या आणि गाडीसोबत ओढल्या जाऊ लागल्या.ड्युटीवर असलेल्या जॉन पॉल यांनी हे पाहताच क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. धावत्या गाडीच्या वेगाचा अंदाज घेऊन त्यांनी तत्परतेने त्या महिलेला सुरक्षितपणे बाजूला खेचले. या धाडसी कृत्यात जॉन पॉल यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत (लचक) झाली, मात्र त्यांनी महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळवले.
अपघातानंतर घाबरलेल्या बेबी गायकर यांना तातडीने तिकीट तपासणी कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांना पाणी देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले. आपला जीव वाचवल्याबद्दल त्यांनी जॉन पॉल आणि रेल्वे प्रशासनाचे डोळे भरून आभार मानले. धावत्या गाड्यांमध्ये चढणे किंवा उतरणे हे अत्यंत धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकते. प्रवाशांनी घाई न करता आपल्या जिवाकडे लक्ष द्यावे आणि रेल्वे नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
“रेल्वे कर्मचारी नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी २४x७ तैनात असतात. जॉन पॉल यांनी दाखवलेले धैर्य हे इतर कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श आहे.” > — मध्य रेल्वे प्रशासन









