राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मविप्र संस्थेशी संबंधित गुन्ह्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलसचिव विनोद पाटील यांचे नाव येत असल्याने विद्यापीठाची बेअब्रू होत आहे. त्यामुळे त्यांचा कुलसचिव पदाचा भार काढून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे यांनी निवेदन स्वीकारले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कुलसचिव नेहमी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असताना दिसत आहेत. आज ते संशयित आरोपी झालेले असून त्यांच्याकडील पदभार तात्काळ काढण्यात यावा. तसेच त्यांच्या जागी जबाबदार, प्रामाणिक, संशयित आरोपी नसलेली व्यक्ती नेमण्यात येऊन आपल्या विद्यापीठाची झालेली मलीन प्रतिमा सुधारण्यास मदत होइल. सदर प्रकरणात कुलसचिव यांच्यासोबत कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांचा देखील पदभार काढण्यात यावा.
सन २०१६ मध्ये अभियांत्रिकी शाखेच्या २१६ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये (८०/२०) पॅटर्न संगणकात फेरफार करून चुकीच्या पद्धतीने पदाचा दुरुपयोग करून नापास विद्यार्थ्यांना पास केलेले आहे. त्यांच्या मार्चमध्ये अजून देखील दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असेही म्हटले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार, अझर शेख, मुक्तार खान, महेंद्र खेडकर, नितीन पाटील, गणेश खाचणे, रमेश भोळे आदी उपस्थित होते.