जळगावला निवडणूक अधिकाऱ्यांनी अपील फेटाळल्यानंतर आता हायकोर्टात आव्हान
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग १० ‘ड’ मध्ये खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १० ‘ड’ मधील लढत आता कायदेशीर पेचात अडकली आहे. महायुतीचे उमेदवार जाकीर खान पठाण यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यामुळे जाकीर खान पठाण यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी छाननीच्या अंतिम दिवशी जाकीर खान पठाण यांच्या अर्जावर हरकती घेताना असा दावा केला होता की, पठाण यांना ५ अपत्ये आहेत. निवडणूक नियमांनुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अपत्ये असल्यास उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतो. या मुद्द्यावरून कुलभूषण पाटील यांनी जळगाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर सुनावणी घेतली होती. त्यावेळी कुलभूषण पाटील यांनी सर्व पुरावे आणि दाखले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये स्पष्टपणे जाकीर खान यांना २ पेक्षा अधिक अपत्य आहेत असे दिसत आहे.
तरीही जळगाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कुलभूषण पाटील यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती आणि जाकीर खान पठाण यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला आता कुलभूषण पाटील यांनी थेट छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळे आता न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने कुलभूषण पाटील यांचा दावा ग्राह्य धरला, तर महायुतीचे उमेदवार जाकीर खान पठाण यांची उमेदवारी धोक्यात येणार आहे.
मतदानाच्या तोंडावर ही कायदेशीर लढाई महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. “आम्ही न्यायालयाकडे न्यायाची अपेक्षा ठेवली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवाराबाबत सत्य समोर येईल,” असे मत कुलभूषण पाटील यांच्याकडून व्यक्त केले जात आहे.










