चुंचाळे ता. चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील कृष्णापुर ते उमरटी या आदिवासी गावांना जोडणारा वहिवाट रस्ता होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असून तो दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी आदिवासी भागांतून होत आहे.
कृष्णापूर उमरटी या मार्गाने जळगाव जिल्ह्यातील कापूस बलवाडी. शेंधवा. बाजारपेठेत जात होता. चोपडा तालुक्यातून मध्य प्रदेशास जोडणारा दळणवळणाचा कमीत कमी १० किमी अंतर असणारा रस्ता होता. परंतु, मागील काळात जंगलातील वहिवाट रस्त्यात दगड माती झाडे पडल्याने व अनेक ठिकाणी पाण्याने दरड पडून वाहून गेल्याने रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. कोविड १९च्या काळात चोपड्याच्या बाजारपेठेशी व दवाखान्याच्या संपर्कासाठी सतरासेन व लासुर या गावांना लांब अंतराच्या फेऱ्यात कोणतीही वाहतूक सुविधा नसल्याने मोरचिडा अंमलवाडी गौर्यापाडा उमरटी येथील सर्व पाड्यावरील आदिवासी बांधवांनी या रस्त्यावर पायपीट करून शॉर्टकटने चोपड्याला येत होते.
हा रस्ता जर दुरुस्त झाला तर गत वैभव या दुर्गम भागास प्राप्त होईल. वाहतूक व दळणवळण वाढल्यास आदिवासींच्या प्रवासाच्या सुविधा वाढून वेळ व इंधनाची बचत होईल म्हणून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी गौर्या पाडा येथे आयोजित योगी (पर्यावरण व शाश्वत विकास संस्था दिल्ली ), ( युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया ) ग्राम विकास समितीची तिसऱ्या बैठकीच्या वेळी समितीपुढे समस्यांची चर्चा करण्यात आली. या संस्थेच्या वतीने पर्यावरणीय व शेती संदर्भात विस्तृत विकासाभिमुख कार्याचा उद्देश ही एनजीओ करणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुक्याला व जिल्ह्याला जोडणारा रस्ता दुरुस्त करणे गरजेचे असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. याप्रसंगी योगीचे पदाधिकारी अध्यक्ष गिरीश पाटील व उपाध्यक्ष दिव्यांक सावंत,सचिव प्रणिलसिंह चौधरी, मंगेश पाटील, मनिष साळुंके ,अमोल महाजन, प्रशांत पाटील बैठकीला उपस्थित होते. याकामी गौर्या पाडा या गावातील ग्रामस्थ व सरपंच राजू पावरा. टेमरया बारेला. प्रेमसिंग बारेला काशीराम बारेला, महांग्या बारेला, आपसिंग बारेला, प्रकाश बारेला, देविदास बारेला, चिरंग्या बारेला बैठकीला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला १५ ते २५ वर्ष वयोगटातील तरूण योगी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. संस्थेने ठरवून दिलेल्या कामांचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले व ग्रामस्थांनी सहकार्य करणे विषयी विनंती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सुनील महाजन यांनी आयोजकांचे आभार मानले.