अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डांगरी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :– तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील कृषी विभागाने केलेल्या बंधाऱ्यातील माती बांध वाहून गेल्याने नाल्याच्या काठावरील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुडी शिवारात भरवस रस्त्याजवळ हा नाला बांध आहे. मोठा नाल्यांपैकी हा नाला आहे. या लौकी नाल्याला दि. १७ रोजी आलेल्या पुराने नाल्याजवळ असलेल्या शेतात पाणी घुसले. त्यात बाजरी, तूर, कापूस अशा पिकांचे नुकसान झाले आहे. (केएएन)दरम्यान तलाठी प्रदीप भदाणे व कृषी सहाय्यक यांनी भेट देऊन पाहणी केली. नाल्याच्या उगमस्थानावर प्रचंड पाऊस झाल्याने हा नाला पाण्याने पूर्ण भरून आजूबाजूच्या शेतीत दि. १७ रोजी रात्री पाणी घुसले.
पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की पूरात बंधारा माती बांध वाहून गेल्याने नाल्याजवळ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अद्याप कोणतेही पंचनामे झाले नसून पिके आडवी झाली आहेत.(केएएन) रवींद्र बारिकराव पाटील (बाजरी), युवराज बारीकराव पाटील (भुईमूग), डिगंबर दशरथ चौधरी (तूर), जगदीश धुडकू पाटील (कापूस), गुलाबराव सुकलाल माळी (तूर), भाऊराव बाजीराव पाटील (कापूस), सर्जेराव बाजीराव पाटील (कापूस) आदी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सदर नुकसान झालेल्या ठिकाणी मी भेट दिली असून नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करायला सांगितले आहेत, असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले.