पुणे (वृत्तसंस्था) – औंध येथील नदीपात्र घाटात तरुणावर कोयत्याने सपासप वारकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुण गंभीर जखमी झाला आहे.
आकाश रमेश अडाळे (वय 22, रा. आंबेडकर वसाहत) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात रणजित नागवडे, सनी दिवे, सुमित खरात व त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहणारे आहेत. त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. दरम्यान फिर्यादी व त्याचा मित्र जेवण केल्यानंतर नदीपात्र घाटात गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी त्याठिकाणी हातात कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या डोक्यात कोयता मारला. त्यानंतर आणखी एकदा वार केला. पण फिर्यादीने तो चुकवून हातावर घेतला. यात त्याच्या डोक्याला आणि हातावर गंभीर मार लागला आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, नेमका हल्ला का झाला हे समजले नाही. अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.