जळगाव (प्रतिनिधी) – तीन दिवसांपूर्वी १४ वर्षीय बालकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी २ रोजी आणखी आठ वर्षीय बालकाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनासह इतर आजारांमुळे त्याचा मृत्यु झाला आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील आठ वर्षीय बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी ३० जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. निदान केले असता त्याला गुंतागुंतीचा क्षयरोग आणि न्युमोनिया असल्याचे दिसून आले. नमुना तपासणीसाठी दिला असता तो देखील कोरोनाबाधित असल्याचे आढळले.
दाखल झाला तेव्हा त्याची हृदयक्रिया मंदावली होती. मात्र वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. अखेर बुधवारी २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. क्षयरोग, न्युमोनिया आणि कोरोना यामुळे बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान तीन दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यातील आसरखेडा येथील १४ वर्षीय बालकाचा कोरोना आणि लिव्हरच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या पाच दिवसातील बाल संवर्गातील ही दोन बालके दगावल्याने चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी वेळीच काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासन करीत आहे.