संशयित ताब्यात ; शिये गावातील रामनगर भागात उघडकीस आली घटना
कोल्हापूर (वृत्तसंस्था ) ;- कोलकाता आणि बदलापूर अत्याचार प्रकरण हे दोन्ही प्रकरण ताजी असताना कोल्हापूरातून धक्कादायक घटना समोर आली. कोल्हापुरातील शिये येथे एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. तिच्यावर लैंगिक अत्त्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेपूर्वी पीडित मुलगी बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही २१ ऑगस्टच्या दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर संकुलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे राज्यातील मुली सुरक्षित आहेत की नाही? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 10 वर्षीय मुलीच्या हत्येबाबत माहिती देताना सांगितले की, शिरोली एमआयडीसी हद्दीमध्ये रामनगर इथे तीन वर्षांपूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं. कुटुंब प्रमुख आणि त्याची पत्नी एमआयडीसी कंपनीत मजूर म्हणून काम करते. बुधवारी सकाळी ८ वाजता दोघंही कामाला गेले. त्यांच्या घरात मुलांचा मामाही सोबत राहतो. त्यांना तीन मुली आणि दोन मुलं अशी एकूण पाच मुलं आहेत.
या अल्पवयीन मुलीचे आई-वडील शिरोली औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीत कामाला आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर त्यांना मुलगी कुठेच दिसली नाही. शिये रामनगर येथून एका परप्रांतीय कुटूंबातील १० वर्षीय मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा काहीच पत्ता न लागल्याने याबाबत शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे अन्य सहकारी व स्थानिक नागरिकांनी शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व परिसरातील विहिरी, ओढे व उसाच्या शेतात तपास केला. पण काहीच सुगावा हाती लागला नव्हता. सकाळी चार वाजेपर्यंत पोलीस तपास घेत होते.
नंतर कोल्हापूर पोलिसांच्या श्वान पथकाने अल्पवयीन मुलीचा मृतदेह रामनगर येथील एका उसाच्या शेतामध्ये घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर परिसरात शोधून काढला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलीच्या अंगावर ड्रेस होता, मात्र चप्पल आणि अंतर्वस्त्र बाजूला पडलेली पाहायला मिळाली. पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयीताला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून ही तपासणी झाल्यानंतरच निष्कर्ष काढता येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.