जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड तालुक्यातील कोल्हाडी गावात नियमबाह्य खुलेआम स्फोटक पदार्थांचा व्यापार नागरी वस्तीमधून सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांसहीत शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनिल पाटील यांनी केली होती. गावाला धोकादायक परिस्थितीपासून वाचविण्यासाठी या व्यावसायिकावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. आज सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश जाहीर झाला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी केसरीराजला दिली.
बोदवड येथील मुक्ताई एन्टरप्रायझेस तर्फे अतुल राणे रा. विद्यानगर यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र अटी व शर्तीची पूर्तता न केल्यामूळे रद्द करण्यात आले आहे. स्फोटक परवाना रद्द करण्याचे अधिकार पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्थेला आहे. ना – हरकत प्रमाणपत्र नमूद केल्यानुसार रस्त्याच्या हद्दीपासून रस्त्यास समांतर असा १२ मीटर रुंदीचा सेवा मार्ग ठेवण्यात आला पाहिजे परंतू, स्थळ निरीक्षण नकाशात दर्शविल्याप्रमाणे गट क्रमांक ४७ च्या ऊत्तरेस कोल्हाडी निमखेड रस्ता तर दक्षिणेस कोल्हाडी चिंचखेड सिम शिवरस्ता असून या रस्त्यांना जोडणारा व स्फोटक गोडाउन समोर जाणारा मुरुमाचा कच्चा रस्ता अंदाजे १० ते १२ फूट रुंदीचा दिसून येतो. सदर जागेवर अकृषक वापर करण्यापूर्वी मुक्ताई एन्टरप्रायझेसचे अतुल राणे यांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक होते. परंतू , त्यांचेकडून अटी शर्तीची पुर्तता केली गेली नसल्याने परवाना रद्दचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी काढले आहे.