जिल्हाधिकारी राऊत यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
जळगाव (प्रतिनिधी ) – कोणतेही काम असो, मनावर घेतले कि ते काम होतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्य शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेची फलनिष्पत्ती. अभिमानाची बाब म्हणजे या मोहिमेत जळगाव जिल्हा हा संपूर्ण राज्यात दुसरा आला आहे. त्याबद्दल शनिवारी २६ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आढावा बैठकीत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. हि बाब जळगावसाठी विशेष मानली जात आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान १५ सप्टेंबर पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथे करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात ३ हजार आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. यात महानगरपालिकेच्या १३४, जिल्ह्यातील १८ नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रातील ३३७ तर जिल्हा परिषदेच्या २५३३ पथकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात सुरु केली आणि जळगावात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना पळविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने प्रामाणिकपणाने मेहनत घेत मोहिमेद्वारा रुग्णशोध सुरु केले आणि त्यात त्यांना निर्भेळ यश मिळाले.
शनिवारी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तुकाराम हुलवळे आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यात १४ ते २० सप्टेंबर दरम्यान मोहिमेत ऑनलाईन आकडेवारीत १२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ३७२ सारी आजाराचे रुग्ण तर ५ हजार ४४७ दुर्धर आजार असलेले रुग्ण आढळले. हि आकडेवारी ऑनलाईन शासनाकडे जमा होत होती. त्यानुसार राज्यभरात जमा झालेल्या आकडेवारीत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत उस्मानाबाद पहिले तर जळगाव हे दुसरे आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि त्यांच्या टीमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.