मनपा बरखास्तीसाठी ‘टीम नाथाभाऊ’ कामाला लागली
(विश्वजीत चौधरी)
जळगाव – माजी मंत्री तथा उत्तर महाराष्ट्रातील वजनदार राजकीय व्यक्ती एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर अगदी चौथ्या दिवशी भाजपा मुक्त उत्तर महाराष्ट्र करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मिशन महापालिकेला सुरुवात केली आहे. सोमवारी खडसेंच्या बंगल्यावर आयुक्त सतीश कुलकर्णी यांची खडसेंशी बंदद्वार अर्धा तास चर्चा चालली. या चर्चेदरम्यान नेमके काय घडले याची अधिकृत माहिती मिळत नसली तरी देखील महापालिकेतील समस्या आणि विकास कामांच्या प्रश्नी या बैठकीत जोरदार चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महापालिकेतील नागरिकांच्या समस्या, शहरातील रखडलेले विविध प्रश्न, रस्त्यांच्या, अमृत योजनांच्या कामांचा असे महत्त्वाचे प्रश्न हे अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाहीत. अद्यापही त्याबाबत नागरिकांमधून सातत्याने ओरड होत आहे. याच कारणास्तव तसेच महापालिकेला शासनाकडून मिळालेले विविध निधी, काही कर वसुली देखील झाल्या. मात्र याचा व्यवस्थित ताळेबंद तसेच निधीचे योग्य वाटप योग्य पद्धतीने न झाल्यामुळे खडसेंनी त्याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांकडून कळते. यापूर्वीदेखील खडसे समर्थकांनी आयुक्तांना शहरातील विकासकामांच्या बाबत भेट घेऊन समस्या मांडली होती. आता, विकासकामे होत नाही किंवा शहरातील विकासाचे प्रश्न याच मुद्द्यांवर महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी अप्रत्यक्षपणे खडसे व त्यांच्या गोटातून येत आहे. महापालिका बरखास्त झाल्यास होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाखाली समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून आणायचे व सत्ता स्थापन करायची अशा पद्धतीची एक रचना निर्माण होत असल्याचे चित्र आता तयार झाले असून यासाठी मिशन महापालिका सुरू झाली असल्याची माहिती समर्थकांकडून मिळत आहे. यासाठी खडसे समर्थकांकडून जोरात तयारी देखील सुरू झाली आहे. दिवाळीनंतर महापालिकेत काय धमाका होईल याबाबत आता लवकरच उत्तरे मिळणार आहेत.
महापालिकेत भाजपला धक्का देण्यासाठी खडसे समर्थकांचा अभ्यास सुरू झाला आहे. सत्तेत असलेल्या भाजपला 57 नगरसेवक असून देखील सत्ता चालविता येत नाही, असा सातत्याने आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या 57 नगरसेवकांमध्ये गट पडून तीन ते चार गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षात असलेले शिवसेना देखिल सध्या शांत आहे. शिवसेनेची धार देखील बोथट झाली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जरी खडसे यांची भेट घेतली असली तरीदेखील मनपात भविष्यात भाजपची सत्ता येऊ द्यायची नाही एवढा एकच मनसुबा सेनेचा सध्यातरी दिसत आहे.