गाण्याच्या रेकॉर्डिंग पाठवणार आशियासह इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे
जळगाव (प्रतिनिधी) : अवयवदान जनजागृतीसाठी व ऑगस्ट २०२५ मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्ससाठी जळगावच्या किडनी प्रत्यारोपित किशोर सूर्यवंशी याने ५ एप्रिल रोजी सलग १० तास गायन करण्याचा विक्रम केला आहे. असं करणारा किशोर हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला व्यक्ती ठरणार आहे. सकाळी ९.३० वाजता सुरुवात करून सायंकाळी जवळ-जवळ ८ वाजेपर्यंत किशोर ने बॉलिवूड च्या ७ दशकांच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले. हा विश्वविक्रम आपल्या नावे करण्यासाठी तो लवकरच गाण्याच्या रेकॉर्डिंग आशिया व इंडिया बुक रेकॉर्ड कडे पाठवणार आहे.
छाया किडनी फाऊंडेशन, सुखकर्ता फाऊंडेशन व आनंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव मधील म्युझिक स्टेशन स्टुडिओ मध्ये हा कार्यक्रम शनिवारी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे आठ पर्यंत सुरु होता. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करून उदघाटन करण्यात आले. त्या नंतर किशोर सूर्यवंशी यांनी अवयवदानावरील स्वतः लिहिलेले व गिटारवर कंपोज केलेल्या अवयव दान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीस १९५० च्या दशकापासून सुरु झालेला सुमधुर गीतांचा हा प्रवास सायंकाळी ८ पर्यंत २०२५ च्या गाण्यांपर्यंत येऊन थांबला. या दहा तासांच्या वेळेत किशोरने साधारण ७ दशकातील १५० गाणी गायली.
या प्रसंगी सुखकर्ता फाऊंडेशनचे डॉ. नरेंद्र ठाकूर, आनंद हॉस्पिटलचे डॉ. अमित भंगाळे, संजय सूर्यवंशी, म्युझिक स्टेशनचे अप्पा नेवे, शरद भालेराव, शाम जगताप, आर जे शिवानी, निकिता चौधरी, माधुरी सूर्यवंशी, सोनल चव्हाण यांचे सहकार्य लाभले. किशोर सूर्यवंशी याने सलग दहा तास गायलेल्या गाण्यांची रेकॉर्डिंग तो लवकरच आशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ला पाठवणार आहे. या उपक्रमातून अवयवदान जनजागृतीची चळवळ अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याचा त्याने संकल्प केला आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स मध्ये किशोर सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत.
००००००००००