जळगाव तालुक्यात फूपणी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मुलाला अभ्यासावरून बोलल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने वाद घालत एका शेतकऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना जळगाव तालुक्यातील फुपाणी येथे घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार राजमल संतोष सपकाळे (वय ४८, रा. फुपणी) हे दि. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर होते. राजमल यांनी आपल्या मुलाला, “तुझे १० वीचे पेपर सुरू आहेत, मग तू बाहेर का फिरतोय?” असे विचारले. यावरून शेजारी राहणारा आरोपी नितीन राजेंद्र सपकाळे याला वाटले की राजमल हे त्याला उद्देशून जोरात बोलत आहेत. “तू मला पाहून मुद्दाम जोरात बोलतोय का?” असा जाब विचारत नितीनने वादाला सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी संगनमत करून राजमल सपकाळे यांना लाकडी दांडक्याने पाठीवर व तोंडावर मारहाण करून जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या शोभाबाई आणि यश यांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच “तुम्हाला जीवे ठार मारून टाकू” अशी धमकीही दिली. नितीन राजेंद्र सपकाळे, प्रकाश सुका सपकाळे, ज्ञानेश्वर प्रकाश सपकाळे, गणेश प्रकाश सपकाळे (सर्व रा. फुपणी, ता. जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेप्रकरणी राजमल सपकाळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक देवराम चौधरी करत आहेत.







