अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) –अमळनेर शहरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवारी दि. २६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर शिरूड नाका भागातील सचिन सुधाकर वराडे (वय ३७) हा रेशन दुकानशेजारील घराच्या ओट्यावर उभा असताना राजेंद्र ऊर्फ बापू प्रताप महाजन हा सचिनला तू माझ्या ओट्यावर का उभा आहे, असे विचारले. त्यावर सचिनने हे आमचे पण घर आहे, असे सांगितल्याचा राग आल्याने राजेंद्र त्याला शिवीगाळ व मारहाण करू लागला. सचिन तेथून निघाल्यावर काही वेळात राजेंद्रने मागाहून जाऊन सचिनच्या गळ्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे व पोलिस कर्मचारी संजय पाटील यांनी भेट दिली. पोलिसांनी जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे.