यावल तालुक्यात मोहराळा येथे घडली होती घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहराळा येथे विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला होता. कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप केला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर तपास केला. यात पत्नीला शेतीत हिस्सा मिळावा यासाठी दोघ अल्पवयीन आरोपी यांच्या मदतीने माजी पोलीस कर्मचारी असलेल्या मामाने तरुणाचा विहिरीत ढकलून खून केल्याचे तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी तिघांविरुध्द यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
साहिल शब्बीर तडवी (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी व माजी पोलीस कर्मचारी अयुब हसन तडवी यांच्या शालकाचा साहिल हा मुलगा असून अयुब तडवी यांना शेती घेण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला पाहिजे होता. त्याची पत्नी ही मयत साहिलची सख्खी आत्या असल्याने साहिलचे काका रशीद हबीब तडवी यांच्या उताऱ्यानुसार शेतीचा दाखला मिळवून खरेदी केली होती.(केसीएन)त्यानंतर सदर शेतीमध्ये संशयित अयुब तडवीच्या पत्नीचे नाव असल्याने शेतीत हिस्सा मिळावा यासाठी अयुब तडवी हा मयत साहिल शब्बीर तडवी व फिर्यादी समीर गफूर तडवी यांच्याशी भांडण करून साहिल यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. या कारणावरून संशयित आरोपी आयुब हसन तडवी यांनी दोघ अल्पवयीन आरोपी यांच्याशी संगनमत करून साहिल यास जीवे ठार मारण्याचा कट रचला.
त्याप्रमाणे अयुब हसन तडवी यांच्या सांगण्याप्रमाणे दोघे अल्पवयीन आरोपी यांनी मयतास त्यांनी त्यांचे ताब्यातील बजाज प्लेटिना मोटरसायकल वर बसवून रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत पाण्यात ढकलून दिले. खुनासंदर्भात यावल पोलिसात समीर तडवी यांच्या फिर्यादीवरून दि.१६ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.(केसीएन)मात्र घातपाताचा संशय मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्यामुळे प्रेत विहिरीतून बाहेर काढल्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. दोघे अल्पवयीन आरोपींना जळगाव येथे बालसुधार गृहात पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली.