गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना अटक : मुक्ताईनगर पोलिसांचा सिनेस्टाईल मेहनती तपास
जळगाव (प्रतिनिधी) : धुळे-नागपूर या महामार्गावर दिनांक ५ जुलै रोजी रात्री अज्ञात व्यक्तीचा अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र मुक्ताईनगर पोलिस यंत्रणेने कसून तपास केल्यावर हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी थेट गोंदिया जिल्ह्यात जाऊन संशयित दोघ आरोपींना अटक केले आहे. या दोघांनी त्याच्या गावातीलच मित्राचा लक्झरी बसमधून फेकून देत खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सिद्धार्थ विकास बनसोड (वय ३५ रा. गोंडवाडी ता. तिरोडा) असे मयत इसमाचे नाव असून खून प्रकरणी स्वप्निल गजराम परिहार (वय २७, रा. बोदा ता. तिरोडा, जि. गोंदिया) व भरत चुनीलाल रहांगडाले (वय ३२, रा. भजेपार ता. तिरोडा) यांना अटक केली आहे. (केसीएन)मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांना गोंदिया जिल्ह्यातून अटक केली आहे. दिनांक ५ जुलैच्या सकाळी अज्ञात व्यक्तीचे प्रेत हरताळा फाटा जवळील हॉटेल जवळ महामार्गावर पडले असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती.
ट्रकचालकाची माहिती अन पोलिसांची चिकाटी
दिनांक ५ जुलैच्या सकाळी दसरखेडा एमआयडीसी पोलिसांना एका ट्रक चालकाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती लक्झरी बसमधून पडल्याची माहिती दिली. (केसीएन)यादरम्यान दसरखेडा पोलिसांनी मात्र ट्रक चालकाची कोणतीही माहिती घेतली नाही. असे असताना अकस्मात मृत्यूची नोंद झालेला व्यक्ती हा लक्झरी बसमधून पडल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना दिली. त्यानुसार तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी दसरखेडा टोल नाक्यावर जाऊन जाणाऱ्या लक्झरी बसेसची माहिती काढली. तर कोणत्या वेळेला ट्रक गेले याची देखील माहिती काढली.
त्यानुसार विविध मार्गानी माहिती काढल्यानंतर त्यातील (एमएच १८ एम ३३९७) या ट्रकवरील चालकाने दसरखेडा पोलिसांना माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून ही ट्रक किती वाजता मलकापूरकडे गेली असेल त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपासाला सुरुवात् केली व सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले. त्यामध्ये जवळपास ७० लक्झरी बसेसची ये-जा यादरम्यान झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले व त्या दृष्टिकोनातून त्यांनी तपास कामाला सुरुवात केली.(केसीएन)त्यातील नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसेसची माहिती काढत तीन बसेसवर पोलिसांना संशय होता.
तीनही लक्झरी बसेसमधील नोंद केलेल्या प्रवाशांची माहिती घेतली. तसेच लक्झरी बस कोणत्या हॉटेलवर किंवा थांब्यांवर थांबली याची माहिती घेत प्रवाशांची चौकशी पोलिस पथकाने केली. मात्र केवळ एका छोट्या सुगाव्याचा धागा पकडत मुक्ताईनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत हा अपघात नसून दोन मित्रांनी मित्राचाच खून केल्याची बाब उघडकीस आणल्याबद्दल पोलिस निरीक्षक नागेश मोहिते व पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर यांचे कौतुक केले जात आहे.
असा लागला तपास
तपासातील माहितीवरून या लक्झरी बसमधील स्वप्निल गजराम परिहार (वय २७, रा. बोदा ता. तिरोडा, जि. गोंदिया) या प्रवाशाच्या भ्रमणध्वनीवरून तिकीट बुक केल्याचे निष्पन्न झाले. मात्र तिकीट नागपूरपर्यंत बुक केले होते. मुक्ताईनगर पोलिसांचे एक पथक तत्काळ तिरोडा येथे पोहोचले व तब्बल सहा गावांची माहिती काढली. त्यातून बोदा येथे स्वप्निल याचा शोध लागला. (केसीएन) त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्याचा साथीदार भरत चुनीलाल रहांगडाले (वय ३२, रा. भजेपार ता. तिरोडा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोघांना पोलिस खाक्या दाखवताच दोघांनी सिद्धार्थ विकास बनसोड (वय ३५ रा. गोंडवाडी ता. तिरोडा) याला सीट क्रमांक ९ व १० च्या खिडकीतून धावत्या लक्झरी बसमधून फेकून दिल्याची कबुली दिली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुक्ताईनगर पोलिस पथकाने दोघांना ताब्यात घेत तत्काळ अटक केली आहे. अपघात ते खून असा प्रवास केवळ १३ दिवसात मुक्ताईनगर पोलिसांनी केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
पथकामध्ये पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर, संदीप वानखेडे, मुकेश महाजन, निखिल नारखेडे, ईश्वर पाटील, गौरव पाटील यांनी कामगिरी बजावली.