चौघांना अटक, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील फुलगाव येथील मजूर तरुणाचा वायर चोरण्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पंकज रामचंद्र सोनवणे (वय २०, रा. धामणगाव, ता. शहापूर जि. बऱ्हाणपूर, ह. मु. चिंचोल ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो चिंचोल येथे आई, वडील, दोन भाऊंसह राहतो. सर्व जण हातमजुरी करतात. २८ जून रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी घटना घडली आहे. पंकज सोनवणे हा संशयित आरोपी अविनाश पुंडलिक पाटील (वय ५४, रा. फुलगाव ता. भुसावळ) यांच्या शेतात गेला होता. तेथे पंकज हा वायर चोरी करीत असेल असा संशय आल्याने संशयित अविनाश पाटील याने आणखी तिघांना बोलावून घेतले. त्यांनी पंकजला जाब विचारून कुठल्यातरी धारदार शस्त्राने डावे बाजूस छातीवर, पोटावर, पायावर गुडघ्यावर, पाठीवर मारहाण करून त्यास जीवे ठार मारले.
तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावरील कपडे काढून फेकून दिले. वरणगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याला मयत घोषित करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार मयत पंकज सोनवणे याला मारहाण झाली असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार २ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी यांच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. त्यानुसार शेतमालक संशयित अविनाश पाटील यांच्यासह विजय सुधाकर चौधरी (वय ४०), संतोष मुरलीधर कोलते (वय ५२), सुपडू उर्फ नरेंद्र यशवंत चौधरी (वय ४५, सर्व रा. फुलगाव ता. भुसावळ) यांना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ५ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपास सपोनि आशिष अडसूळ हे करीत आहेत.