यावल न्यायालयाचा निर्णय
यावल (प्रतिनिधी) : फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात अंजाळे येथील एकाने एका प्रकरणात खोटे भाऊ बहिण उभे केले होते व शासनाची तब्बल १३ लाखात फसवणूक केली होती. घटना २०१९ मध्ये घडली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यावल न्यायालयात या व्यक्तीविरुद्ध आरोप सिध्द झाल्याने त्याला ३ वर्ष ११ महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
यावल तालुक्यातील अंजाळे येथील त्र्यंबक रामचंद्र सपकाळे यांनी २०१९ मध्ये फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका प्रकरणात खोटे बहिण व भाऊ उभे करून शासनाची सुमारे १३ लाखात फसवणूक केली. याबाबत उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांनी संशयित आरोपीविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल न्यायालयात गुन्ह्याचा खटला चालला. यात सरकारी वकील निलेश लोखंडे यांनी एकूण १७ साक्षीदार तपासले व संशयित आरोपीविरोधात गुन्हा सिध्द झाला. या खटल्यात यावल न्यायालयाचे सह दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांनी आरोपीस ३ वर्ष ११ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी हा २०२० पासून तुरूंगात असल्याने उर्वरीत दिवस शिक्षेतून वगळण्यात येणार आहेत. खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता म्हणून निलेश लोखंडे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी महिला पोलीस कर्मचारी सुशीला भिलाला यांनी पाहिले.