रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन
रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे रस्त्याची दुरवस्था आणि नागरी सुविधांच्या अभावामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने, परिसरातील महिलांनी जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील मुख्य रस्ता पत्र्याचे कुंपण लावून बंद केला. जोपर्यंत रस्त्याचे काम मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.
खिर्डी बुद्रुक गावातील मध्यवर्ती भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पेव्हर ब्लॉक आणि गटारींची व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना, विशेषतः महिलांना, मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अखेर आज सकाळी महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रस्ता बंद केला.
महिलांची संतप्त प्रतिक्रिया
या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या वंदनाबाई पाटील आणि सुनंदाबाई भंगाळे यांनी आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, “आम्ही या रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळलो आहोत. यावरून चालणेही अवघड झाले आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.”
या संदर्भात खिर्डी बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच, संगीता भास्कर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, “गावातील रस्त्याचे काम खासदार रक्षाताई खडसे यांच्या निधीतून काँक्रिटीकरणद्वारे प्रस्तावित होते, परंतु ग्रामस्थांनी पेव्हर ब्लॉकची मागणी केली. त्यासाठी आवश्यक निधी ग्रामपंचायतीकडे नाही. त्यामुळे आमदार निधीतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निधी मिळताच लवकरच काम सुरू केले जाईल.” महिलांच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, आता या रस्त्याचे काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.