सावकारेंकडे नंदुरबार तर महाजन यांचेकडे विदर्भ किंवा मराठवाड्यातील शक्यता
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्य शासनाकडून खातेवाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्ह्यात तीनही कॅबिनेट मंत्र्यांकडे विविध खात्यांची जबाबदारी आली आहे. खातेवाटपानंतर आता चर्चा पालकमंत्री पदाची रंगू लागली आहे. जळगावचे पालकमंत्रिपद हे पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांच्याकडे जाणार असल्याची तर संजय सावकारेंकडे नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपचे वजनदार नेते गिरीश महाजन यांचेकडे आता मराठवाड्यातील हिंगोली, जालना, विदर्भात अकोला, अमरावती यापैकी एक किंवा २ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने आजवर जी जबाबदारी दिली आहे ती त्यांनी यथायोग्य पार पाडली आहे. त्यामुळे महाजन यांना आता मराठवाडा किंवा विदर्भात पालकमंत्रीपद देण्याविषयी पक्ष सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे जिल्ह्यातील एकमेव मंत्री जयकुमार रावल यांचेकडे जाण्याची दाट शक्यता आहे. धुळे येथील महायुतीतील पक्षांनी पालकमंत्रिपद हे स्थानिक नेत्याकडेच असावे अशी विनंती श्रेष्ठींकडे केली असल्याने धुळ्यातील पालकमंत्रीपद हे रावल यांच्याकडे जाणार आहे.