योजना ३० नोव्हेंबरपर्यंतच सुरु
जळगाव (प्रतिनिधी) :- दि. ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणची अभय योजना २०२४ सुरु आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ०१ सप्टेंबर २०२४ रोजीपासून ही योजना सुरू झाली. सदर योजना ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुरु आहे.
योजना काळात २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत जळगाव परिमंडलातील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील ३१०२ ग्राहकांनी ३ कोटी ८९ हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. योजनेच्या कालावधीत परिमंडलातील ३१०२ ग्राहकांनी ३.०९ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे ३१०२ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण ८६.०४ लाख रूपये माफ झाले आहेत. कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.
योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. तरी अधिकाधिक कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे. योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना दहा टक्के तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट असणार आहे. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या ३० टक्के रक्कमेचा भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणी घेण्याची तत्काळ संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा ३० टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही योजनेत उपलब्ध आहे.
०१ सप्टेंबरपासूनच्या योजना काळात २२ नोव्हेंबरपर्यंत जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या १९७९ ग्राहकांनी योजनेत २ कोटी १९ लाख रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. धुळे जिल्ह्यातून ७८२ ग्राहकांनी ५५ लाख ५५ हजार रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून १३९ ग्राहकांनी ३३ लाख ५५ हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.