जळगाव (प्रतिनिधी) ;- महाराष्ट्रात खानदेशखेरीज अन्य कुठेही हा उत्सव साजरा होत नाही.कानबाई उत्सव आणि खानदेश यातील संबंध अतूट आहेत. मात्र, वर्षानुवर्षांच्या रूढी- परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कानबाई मातेचा उत्सव या उत्सवाला शनिवारी भाजी- भाकरच्या रोटने सुरुवात झाली. आज (११ ऑगस्ट) दुपारी कानबाई मातेची स्थापना करण्यातआली. दरम्यान, सोमवारी (१२ऑगस्ट) विसर्जन होईल.
कानबाई ही खानदेशातील प्रमुख कुलदैवत मानली जाते. खानदेशातील ब्राह्मण, वाणी, मराठा , सोनार, शिंपी, सुतार, लोहार, नाभिक, माळी, चांभार आदी समाजबांधव श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाईची पूजा करतात. या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने ‘नवसपूर्ती’ करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात.
कानबाईचे पारंपरिक महत्त्व
कानबाई प्रतिष्ठापनेवेळी पितळी अथवा लाकडी मुखवटा धारण केलेली मूर्ती अथवा श्रीफळाची पूजा-अर्चा करून त्यास ‘कानबाई’ असे संबोधून हिरवे वस्त्र परिधान करून आभूषणांनी सजवून प्रतिष्ठापना केली जात असे. या उत्सवांतर्गत केले जाणारे ‘रोट’ त्या- त्या समाजांतील, भाऊबंदकीतील सदस्य एकत्रित येऊन केले जात असतात. तसेच कानबाई प्रतिष्ठापना अथवा ‘रोट’ करतेवेळी भाऊबंदकीत यंदा कोणाचा मृत्यू तर झालेला नाही ना, तसेच कुटुंबातील स्त्री प्रसूत झालेली नाही ना, हे आवर्जून तपासले जात असते. मात्र, आता या गोष्टींकडे फारसे कुणीही लक्ष देत नसल्याचे दिसत नाही.
दुसऱ्या दिवशी होते विसर्जन
कानबाईची स्थापना झाल्यानंतर रात्री गावातील लोकांसह परिसरातील आबालवृद्ध एकत्रित येतात. यावेळी रात्रभर स्वरचित गाणी म्हणत, फुगड्या खेळत, थट्टा- मस्करी करीत जागरण केले जात असते. दुसऱ्या दिवशी गावातील लोक अर्धा दिवस कामकाज बंद ठेवून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.
श्रावणात नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी खानदेशात घरोघरी कानबाईची स्थापना होते. हा भाऊबंदकीचा उत्सव असतो. साऱ्या भाऊबंदकीला भावनिक एकतेने बांधून ठेवतो. नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी गायीला गोऱ्हा झाला आणि त्याच दिवशी घरात मुलाचा जन्म झाला, तर कानबाईची स्थापना करतात. दुसरे कारण म्हणजे कानबाईला नवस केल्यानंतर तो पूर्ण झाला तर कानबाईची स्थापना करतात. एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर ती कानबाईला ‘नवस’ करते. दरम्यान, चैत्र-वैशाखातल्या कानबाईसमोर सामूहिक विवाहाची सुधारणावादी दृष्टी आली. आजही अनेक गावांत असे सामुदायिक विवाह होत आहेत. कानबाई ‘नवसाची देवता’ आहे. तिच्यावर अहिराणी भाषकांची नितांत श्रद्धा आहे. श्रावणातील शुक्ल पक्षात कानबाईची पूजा करतात. या देवतेची खानदेशात कोठेही यात्रा भरत नाही. कानबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने नवसाची परिपूर्ती करण्यासाठी भाविक कानबाईची प्रतिष्ठापना करतात.