पहुरच्या नातेवाईकांचा डॉक्टरांवर संताप
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील एका गर्भवती महिलेस जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिझरीयन करून शनिवार, दि. १८ मे रोजी दुपारी मातेने बाळाला जन्म दिला. मात्र त्याने श्वास घेतला नाही. त्यापाठोपाठ दोन दिवसांनी आईचाही सोमवार दि. २० रोजी सकाळी ८.३० वाजता मृत्यू झाला. जळगाव शहरातील खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माय-लेकाचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
श्रद्धा जयेश सोनसुतकर (वय २८, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेस पाच वर्षांची मुलगी आहे. पती,सासू,सासरे असा तिच्या पश्चात परिवार आहे. त्यांचे पती जयश्री फायनान्स व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. महिलेचे सासरे राजेश भीमराव सुनसोतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रध्दा सुतसोतकर ही गर्भवती होती.तिला ४ जून ही प्रसूती तारीख जळगाव शहरातील एका खाजगी हाॅस्पिटल येथिल डाक्टरांनी दिली होती. शनिवार दि. १८ रोजी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात तिचे पती जयेश याने आणले. नातेवाईकांना पूर्व माहिती न देता तिची सोनोग्राफी दुपारी २ वाजता केली. त्यानंतर तिला ॲडमिट करण्याचे सांगितले. त्यानुसार तिला दाखल केले.
दुपारी २.१५ वाजता विवाहितेचे सिझरीयन केले. तिने पुरुष बाळास जन्म दिला. नाळ कापल्यानंतर बाळाला आक्सीजन दिला मात्र त्याचा मृत्यू झाला. बाळाच्या आईची प्रकृती बरी आहे असे सांगितले. उपचारात दोन तीन दिवसात ती चांगली होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री २ वाजता महिलेची तब्येत खालावली. खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पहाटे ४ वाजता अन्य ठिकाणी महिलेस दाखल करण्याचे सांगितले.
रविवार पहाटे ५ वाजता शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. याठिकाणी उपचाराला महिलेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महिलेस घाटी रुग्णालयात येथे दाखल करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार नातेवाईकांनी जवळच दुसऱ्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सोमवार दि. २० रोजी सकाळी ८.३० वाजता महिलेचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केल्या दरम्यान पुढील कार्यवाहीसाठी महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देण्यात आला होता या ठिकाणी जळगाव शहरातील एका खाजगी हाॅस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.