भाजप मंत्री संजय सावकारे, आ. भोळे, आ. जावळे यांची पत्रकार परिषद
जळगाव (प्रतिनिधी) :- एकनाथ गणपत खडसे ही एक व्यक्ती नसून एक विकृती आहे. वारंवार एखादी गोष्ट खोटे बोलून रेटून सांगायची या पद्धतीच्या माध्यमातून भाजपाचे पक्ष नेतृत्व बदनाम करायचं हा त्यांचा कायमस्वरूपीचा धंदा आहे. खरंतर एकनाथ खडसे नेहमी सांगतात की, मी ४० वर्षापासून पक्ष वाढवला. पक्ष मी मोठा केला. मात्र, भारतीय जनता पार्टी हा एक विचार आहे. या प्रवाहामध्ये अनेक लोक आले. अनेक खडसेंसारखे बाजूला झालेत. हा विचार कोणीही देशात थांबू शकले नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताना पुरावे देऊन बोलावे, हवे तर पुरावे घेऊन आमनेसामने या असे आव्हान आ. मंगेश चव्हाण यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी पत्रकार परिषदेत दिले.
पत्रकार परिषदेला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, आ. अमोल जावळे, दोन्ही जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी व चंद्रकांत बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आ. राजूमामा भोळे म्हणाले की, विकासाला घेऊन पुढे जायला हवे. आ. खडसेंनी ४० वर्षांत चांगले काम केले असेल, मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आरोप करताना पुरावे देखील दिले पाहिजे. बेछूट आरोप ना. महाजन यांच्याविषयी होऊ नये. देशासह राज्यात, जिल्ह्यात विकासाची गंगा सुरु आहे. ना. महाजन यांनी हुडकोचे कर्ज मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध विकासासाठी भाजपच्या नेत्यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आहे.
यावेळी आ. अमोल जावळे यांनीदेखील, आ. खडसेंनी पुरावा असेल तर बोलावे. अन्यथा भाजपच्या नेत्यांवर बेछूट आरोप करू नयेत असे सांगितले. आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, खडसेसाहेब, खरंतर तुमचं वय वाढलय. आम्ही तर काय परमेश्वराला सांगूच की, तुम्हाला परमेश्वराने जास्त आयुष्य दिलं पाहिजे. कारण की भाजपात तुम्ही नसताना तुमच्या समोर भारतीय जनता पार्टीचे सगळे कर्तृत्ववान नेते, आमदार काम कसं करता ते बघायलाही कोणी असलं पाहिजे. राज्याचा विधानसभेतला एखादा सदस्य, एखादा माजी मंत्री, ज्यावेळेस काही बोलतो त्याच्याजवळ पुरावांचा आधार असला पाहिजे. खडसेंकडे कुठलाही एक पुरावा नसताना आपण वारंवार मंत्री गिरीश भाऊंच्या चारित्र्याविषयी हनन करतात. माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे, आपण आपल्या स्वतःच्या गावात, सांगाल तिथे, मी मागे आपल्याला अनेकदा सांगितलं आहे. आपण कुठल्याही मुद्द्यावर अगदी विकासाच्या मुद्द्यावर सांगा, चारित्र्याच्या मुद्द्यावर सांगा, तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मुद्द्यावर सांगा, तुम्ही करप्शन म्हणतात, कुठल्याही मुद्द्यावर आपण समोरासमोर यावं. वर्षानुवर्ष आपण असे बिनबुडाचे आरोप करून जनमानसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची गिरीशभाऊंची प्रतिमा मलीन करण्याचा वारंवार जो प्रयत्न करत आहे हा अतिशय चुकीचा लज्जास्पद आणि खालच्या स्तराला जाणार आहे, असेही आ. चव्हाण म्हणाले. मंत्री संजय सावकारे म्हणाले की, आरोप प्रत्यारोप काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र त्याला अर्थ नाही. पुरावे असल्याशिवाय हवेत बाण मारणे बरोबर नाही. आ. खडसेंनी भाजपच्या नेत्यांवर बेताल वक्तव्य करणे थांबावे, असेही त म्हणाले.पत्रकार परिषदेला भाजपचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.