पुणे ( प्रतिनिधी ) – आता एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा याच सीडीला घेऊन सूचक इशारा दिलाय. माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असं सूचक विधान खडसे यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे आता पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
पुण्यातील भोसरी जमीन खरेदीमुळे अडचणीत आलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून एकनाथ खडसे आणि भाजप नेते यांच्यात नेहमीच शाब्दिक वाद होतात. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असा सूचक इशारा एकनाथ खडसे यांनी यापूर्वी अनेकवेळा दिलेला आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्याकडे असलेल्या सीडीमध्ये नेमके काय आहे ? ते अद्याप कोणालाही माहिती नाही.
ओबीसी आरक्षण न मिळण्याला भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. केंद्र सरकारने ओबीसींवर अन्याय केला. वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आलं असतं. ओबीसींवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. ओबीसींचं राजकारण कमी करण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पाहून नाटक केलं आणि कायदा केला मात्र तो टिकणार नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर केली.
यावेळी एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारने दुकानात वाईन विक्री करण्यास दिलेल्या परवानगीबाबातही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस गोव्यात बसून महाराष्ट्र हे मद्य राष्ट्र होईल असं म्हणत असतील तर गोव्यात दारूबंदी होईल. भाजपचा कार्यकर्ता दारू पिणार नाही. भाजपची वाईनच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे. ती त्यांनी जाहीर करावी. महाराष्ट्रात वाईनला विरोध करायचा आणि मध्य प्रदेशात बिअर विक्रीला परवानगी द्यायची. गोव्यात गल्ली गल्लीत दारू मिळते. मध्यप्रदेश हा मद्य प्रदेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दारू विकणार नाही, असं जाहीर करावं असं आव्हान देतो. त्यांनी जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकावा म्हणजे त्यांची भूमिका समोर येईल,” असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.
पुढे त्यांनी त्यांच्याविरोधातील आरोप तसेच ईडीची चौकशी याविषयीदेखील आपली भूमिका मांडली आहे. “पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का ? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे. माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा.” असे खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.