गुलाबरावांची राजकीय अवस्था बिकट, चुकीचे निर्णय ठरले महागात
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांची राजकीय अवस्था आता बिकट झाली आहे. देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार या वृत्ताला त्यांनी स्वतः दुजोरा दिल्यावर आता पक्ष कार्यालयात त्यांना विरोध करणारे चक्क फलकच लागले आहे. याबाबत ‘केसरीराज’ने दिलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.
गुलाबराव देवकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शरदचंद्र पवार गटाने त्यांना उमेदवारी देखील दिली होती. देवकरांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाने प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना ८४ हजार मते पडली होती. आता ५९ हजारांच्या मताधिक्याने गुलाबराव पाटील यांनी पराभव केल्यानंतर मात्र त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहणे सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबतच्या वृत्ताला त्यांनी स्वतः दुजोरा दिला.
यामुळे आता अजित पवार गटात खळबळ उडाली असून अगदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये गुलाबराव देवकरांना बंदी असल्याचे चक्क फलक देखील लागले आहे. तसेच मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाकडून देवकरांच्या प्रचारासाठी मेहनत घेतली म्हणून चक्क आत्मक्लेश आंदोलन देखील करण्यात आले. गुलाबराव देवकरांना जर प्रवेश दिला तर अंतर्गत कलह वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना विजय प्राप्त करायचा असल्यामुळे त्यांना गुलाबराव देवकर यांना प्रवेश झालेला मान्य राहणार नाही.
तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये जसे एकनाथ खडसेंना तीव्र विरोध आहे, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादी अजित पवार गटात जर देवकरांचा प्रवेश झाला तर गुलाबराव देवकरांना विरोध होणार आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एक असा नेता असणारच आहे की ज्यामुळे पक्षामध्ये कायम बेबनाव राहणार आहे.