पाच वर्षीय वल्लभ कुलकर्णीसह भारतीय वंशाचे विदेशी खेळाडू स्पर्धेचे केंद्रबिंदू
जळगाव ( प्रतिनिधी ) – जैन हिल्समधील अनुभूती मंडपम् या ठिकाणी होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याहस्ते होणार आहे. त्यांच्यासमवेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष तथा अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार अशोक जैन, जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे व जैन स्पोर्टस अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले असतील.
३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन २ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान जळगाव येथील जैन हिल्स परिसरातील अनुभूती मंडपम् येथे होईल. जळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य स्वरूपात होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत ५५० च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. विविध राज्यांतील फिडे मानांकन प्राप्त ४०० खेळाडूंचा समावेश यात समावेश आहे. त्यात प्रथम मानांकित पुण्याचा अद्विक अग्रवाल (२२५१), मुलींमध्ये केरळची देवी बीजेस (१८६९) यांच्यासह अनेक खेळाडू हे आशियाई व जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेले अनेक खेळाडू यात आहे. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील वल्लभ अमोल कुलकर्णी (वय ५ वर्ष) या चिमुकल्याने सहभागी झाला आहे. त्याचा खेळ स्पर्धेचे आकर्षण ठरु शकतो. यात भारतीय वंशाच्या काही विदेशी खेळाडूसुद्धा बुद्धिबळाच्या पटावर आपल्या चाली खेळणार आहेत.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे पहिले प्रत्येकी सर्वोच्च सहा सामने डिजिटल बोर्डवर लाईव्ह खेळविले जातील. ११ फेऱ्यांमध्ये २७५ बुद्धिबळ पटांवर भव्य स्वरूपात ही स्पर्धा रंगणार आहे. ११ वर्षांखालील मुलं-मुलींच्या ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत ८ लाखाची बक्षिसे आहेत. वैयक्तीक स्वरुपाचे विजयी, पराजित व बरोबरीत असणाऱ्या सर्व खेळाडूंना रोख स्वरूपात पारितोषिके त्यांच्या खेळाच्या मुल्यांकनानुसार दिले जाणार आहेत. अशा प्रकारची बक्षिसे फक्त जळगावातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या माध्यमातून दिली जातात. जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मार्गदर्शनात होत असून जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे.