शेतकऱ्यांवर मोठे संकट
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचे वादळ व पाऊस सुरु असल्याने
केळी मालाची प्रत खालावत आहे. व्यापारी वर्गाचा खरेदी करण्याचा कल नसल्याने अगदी मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे . सततच्या पावसाने केळी घडावर पावसाचे थेंब साचून राहिल्याने त्यावर काळे ठिपके पडतात. तसेच झाडाच्या बुडाशी पाण्याचे डबके साचून राहिल्याने केळीची लांब वाढ होत नाही . त्याच प्रमाणे वादळ स्वरूप पावसाने केळीचे झाड बुंध्यासह खाली जमिवर पडलेले आहेत. त्यामुळे मागणी घटली आहे .
आधीच आसमानी व सुलतानी संकटात केळी उत्पादक असतानाच आता मागणीच घटल्याने प्रती घड ९० ते १०० रुपयाप्रमाणे विक्री करावी लागत आहे. तसे पाहिले असता प्रती झाडासाठी १०० रुपयाच्या वरच खर्च करावा लागतो. वाढलेल्या रासायनिक खतांच्या किमती पाहाता तसेच वाढती मजुरी तसेच मजुर टंचाई म्हणुन चढ्या मजुरीने कामे वेळेवर करून घेणे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास शेतकऱ्याच्या पदरी काहीच राहात नाही.
महाराष्ट शासनाने आता केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असे सांगितले जात आहे. मात्र केळी महामंडळाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल की व्यापाऱ्यांना ? याबाबत अधिक येणारा काळच सांगू शकेल.