रावेर-यावल तालुक्यात विजेअभावी शेतीचे हाल
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील आसमानी व सुलतानी संकटांच्या घेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आता विजेअभावी मोठया प्रमाणात हाल होत आहेत. अनेक संकटातून वाचलेल्या काही तुरळक केळीबागा विजेअभावी सुकत आहेत. धनदांडगे शेतकरी मात्र ट्रक्टरच्या सहाय्याने विज निर्मिती करून बागा वाचविण्याची धडपड करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केळी बागांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे .
त्यात प्रामुख्याने वादळ वारा, करपा रोग व तयार असलेल्या केळीला भावाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे उत्पादक चक्रव्यूहात सापडलेला आहे. त्यात सर्वांत जास्त कमी दाबाचा विज पुरवठा शेतकऱ्याची डोकेदुखी ठरत आहे. नुकतेच वादळ वाऱ्याने थैमान घातले होते. त्यात अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासकीय पंचनामे करण्याचे काम जोरात सुरू असून प्रशासन कामी लागले आहेत.
तुर्त आता राहिलेल्या बागा वाचविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने केले जात आहे. तांदलवाडी येथील काही शेतकऱ्यांनी वेगळी शक्कल लढवली असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने केळीला पाणी पुरवठा सुरु केला आहे. यामुळे कापणीवर आलेल्या बागा वाचविण्यास थेडीफार मदत होईल असे शेतकरी सांगत असले तरी डिझेलचा खर्च परवडेल का नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे.