शासकीय रुग्णालयात घेतले उपचार
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील वडनगरी फाट्याजवळ सुरु असलेल्या श्री महाशिवपुराण कथेच्या गर्दीत प्रकृती बिघडल्याने भावीकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जयाबाई धुडकू सपकाळे (वय ७०), आशाबाई रेखा चौधरी (वय ६५), दिनेश राळेभात (वय ३५) यांना शुक्रवारी जीव घाबरून आल्यामुळे रुग्णालयात आणण्यात आले होते. तर शनिवारी जयश्री विठ्ठल पाटील (वय २०) चक्कर येऊन पडले. निर्मला आत्माराम सपकाळ (वय ४०), दिव्यांग साई रवींद्र जोशी (वय २४) यांची अचानक प्रकृती खराब झाली. मालुबाई हिम्मत पाटील (वय ६५) यांचा अचानक जीव घाबरून आला. नलिनी नामदेव भोळे (वय ७४, चंदू अण्णा नगर, जळगाव), विशाखा राजेंद्र महाजन (वय २३, पाचोरा) यांनाही शनिवारी संध्याकाळी प्रकृती बिघडल्याने उपचार करण्यात आले.
इंदूबाई ज्ञानेश्वर पाटील (वय ३५, रा. वराड ता. धरणगाव) यांचा पाय सुजून आला होता. तर गुदमरून आल्यासारखे झाल्याने पुंजाबाई काळुसिंग चव्हाण (वय ७३, रा. मलकापूर) यांना ऍडमिट करण्यात आले आहे. महाशिवपुराण कथेच्या ठिकाणी ५ ते ७ लाख लोकांची गर्दी होत असल्याने भाविकांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागत आहे. संख्या जास्त असल्याने वैद्यकीय पथकाचीही तारांबळ उडत आहे.