चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- एका ट्रक चालकास सहा इसमांनी मारहाण करुन त्याच्याकडील १५ हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
चांद पाशा फखीर पाशा सय्यद (रा. याकुबपुरा, ता. बसवाकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांनी याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दि. ११ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादी चांद पाशा कॅप्टन कॉर्नर येथे उभे असताना तरुण अंदाजे १८ ते २२ वयाचे दुचाकीवर आले. त्यांनी फिर्यादीचे हात पकडले. तर दुसऱ्याने त्याच्या खिशात हात घालून पाकीट आणि १५ हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली. फिर्यादी हे त्यांना दूर लोटण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीच्यांनी चैन व इतर शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या बाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी तपासचक्र फिरवीत मध्यरात्री संशयित कन्हैया जितेंद्र देठे (वय २२, रा. नारायणवाडी, चाळीसगाव) व अभय सुभाष राखुंडे (वय १९, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चाळीसगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत. तसेच या घटनेत आणखी दोनपैकी एक जळगाव तर दुसरा धुळे येथील राहणारा आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेत दोन अल्पवयीनांचाही समावेश आहे. पोकॉ. मनोज पाटील, अजय पाटील, नितीश पाटील, आगोणे, गोपाळ पाटील यांच्या पथकाने आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.